नरकासुर प्रतिमा भिजल्याने पथकांची निराशा
प्रतिनिधी /मडगाव
मागील वषी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर नरकासुर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नव्हते तसेच दिवाळी सणही मोठी खरेदी वा रेलचेल नसताना साजरा करण्यात आला होता. यंदा राज्यात कोविड महामारी नियंत्रणात असल्याने गोमंतकीयांनी दिवाळी साजरी करण्यासाठी खास तयारी केली आहे. काहींनी घराबाहेर सजावट केली होती तसेच आकाशकंदील लावले होते. मोकळय़ा जागेत लटकविलेले आकाशकंदील पावसाच्या पाण्यात भिजून खराब होण्याचे प्रकार बुधवारी खूप ठिकाणी दिसून आले.
युवकांनी खुप मेहनत घेऊन यंदा नरकासुर प्रतिमा तयार केल्या होत्या. त्या राज्यातील सर्वाधिक इनामे असलेल्या फातोर्डा येथील फातोर्डा युवाशक्तीच्या स्पर्धेत तसेच मडगावातील सॉलिड पार्टीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणल्या असता त्यातील कित्येक प्रतिमा बुधवारी पडलेल्या पावसात भिजल्या. यामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. नरकासुर स्पर्धा हे बच्चे कंपनीसाठी मोठे आकर्षण असते. त्यामुळे आपल्या पालकांसह बालगोपाळ फातोर्डा व मडगाव येथील स्पर्धांच्या ठिकाणी मोठय़ा संख्येने जमले होते. पाऊस आल्याने त्यांची धांदळ उडाली व आश्रय घेण्यासाठी सर्वांना धावपळ करावी लागल्याचे दिसून आले.