प्रतिनिधी/ मुंबई
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सोमवारी विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात बेळगाव तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार तथा शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला. मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेच्या उरळीकांचन येथे होणाऱया अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत पत्रकारांना सन्मानित करण्यात येते. यंदा पंढरीनाथ सावंत, दीपक प्रभावळकर यांच्याबरोबरच झी 24 तासचे संपादक नीलेश खरे, ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, अच्युत पाटील, तसेच ज्येष्ठ संपादक उत्तमराव दगडू, वृत्तसंपादक भारत रांजणकर व शशिकांत सांडभोर तसेच दीपक तैतके, भगवंतराव इंगळे, राजेंद्र काळे यांना जाहीर झाला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन 27, 28 डिसेंबर रोजी उरळीकांचन येथे होत असून याची घोषणा परिषदेच्या वतीने एस. एम. देशमुख व अन्य पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत केली आहे.