प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार मार्गावरील राष्ट्रीय हमरस्ता 66 वर दुचाक्यांच्या बेकायदा शर्यती लावण्याचे प्रकार चालू असून त्याला बंदी करावी, अशी मागणी लोलये पंचायतीचे माजी पंच सांतान दा कॉस्ता यांनी केली आहे. 12 रोजी माशे, शेळी या भागात अशाच शर्यतीतील एका दुचाकीला झालेल्या अपघातात येथील एका ज्येष्ठ महिलेला गंभीर इजा पोहोचून तिला नंतर मृत्यू आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर रविवारी मडगाव ते पोळेपर्यंतच्या रस्त्यावर महागडय़ा दुचाक्या घेऊन काही युवकांकडून शर्यती लावल्या जातात. यापूर्वी अशा प्रकारच्या शर्यती मडगाव ते वास्को या मार्गावर लावल्या जायच्या. मात्र पोलिसांनी सदर मार्गावर शर्यत घ्यायला बंदी घातल्यानंतर या दुचाकीस्वारांनी मडगाव ते पोळे हा मार्ग वापरायला सुरुवात केली आहे. सध्या तरी मडगाव ते काणकोण आणि माशे ते पोळे पर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक नाही. त्यामुळे पादचारी रस्ता ओलांडताना या ठिकाणी अपघात घडू शकतात.
काणकोण ते मडगाव मार्गावर आणि अन्यत्र देखील बऱयाच ठिकाणी पोलीस वाहनांची गती तपासण्यासाठी दबा धरून असतात आणि वाहनचालकांना तालांव देण्याचे काम करतात. अशा प्रकारे शर्यत लावून जलदगतीने दुचाक्या हाकणारे दुचाकीस्वार त्यांना दिसत नाहीत काय, असा सवाल कॉस्ता यांनी केला आहे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.