आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून मात, मॅक्सवेलचे नाबाद अर्धशतक, केएस भरतचीही फटकेबाजी
दुबई / वृत्तसंस्था
ग्लेन मॅक्सवेल (30 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह नाबाद 50), केएस भरत (35 चेंडूत 44) यांची फटकेबाजी, त्याचप्रमाणे हर्षल पटेल (3-34), यजुवेंद्र चहल (2-18) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने बुधवारी आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून धुव्वा उडवला आणि गुणतालिकेतील आपले तिसरे स्थान आणखी भरभक्कम केले. या लढतीत आरसीबीने राजस्थानला 20 षटकात 9 बाद 149 धावांवर रोखले व प्रत्युत्तरात 17.1 षटकात 3 बाद 153 धावांसह विजय संपादन केला.
विजयासाठी 150 धावांचे आव्हान असताना कर्णधार विराट कोहली (20 चेंडूत 25) व देवदत्त पडिक्कल (17 चेंडूत 22) यांनी 5.2 षटकातच 48 धावांची सलामी दिली. त्यानंतर केएस भरतने उत्तम फटकेबाजी करत राजस्थानची उरलीसुरली आशाअपेक्षा संपुष्टात आणली.
भरतच्या बरोबरीने ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी देखील लक्षवेधी ठरली. अगदी चौफेर, मनमुराद फटकेबाजी करत मॅक्सवेलने राजस्थानी गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. केएस भरत बाद झाला, त्यावेळी आरसीबीला 23 धावांची गरज होती. डीव्हिलियर्सने आपल्या पहिल्याच चेंडूवर परागला डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने चौकार फटकावत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हर्षल-चहलचा भेदक मारा
प्रारंभी, आरसीबीने उत्तम कमबॅक करत राजस्थानला 9 बाद 149 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले. डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद (2-10) व लेगब्रेक गोलंदाज यजुवेंद्र चहल (2-18) यांनी राजस्थानच्या डावाला सुरुंग लावला. त्यापूर्वी राजस्थानची एकवेळ 11 व्या षटकादरम्यान 1 बाद 100 अशी भक्कम स्थिती होती.
पेसर हर्षल पटेल (3-34) या सामन्यातही हॅट्ट्रिक घेण्याच्या उंबरठय़ावर पोहोचला होता. पण, कार्तिक त्यागीने त्याची हॅट्ट्रिक होऊ दिली नाही. राजस्थानतर्फे इव्हिन लुईसने 37 चेंडूत सर्वाधिक 58 धावांचे योगदान दिले. मात्र, अगदी मोक्याच्या क्षणी विकेट फेकत त्याने निराशाही केली. अगदी संजू सॅमसन (19) देखील याच वळणावर गेला.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर इव्हिन लुईस व यशस्वी जैस्वाल (31) यांनी आक्रमक फलंदाजीवर भर देत 8.2 षटकात 77 धावांची जोरदार सलामी दिली. या जोडीने प्रारंभी सावध फलंदाजी केली. पण, नंतर जैस्वालने सिराजला कव्हरकडे चौकारासाठी तर मॅक्सवेलला लाँगऑनकडे षटकारासाठी पिटाळत आक्रमक फटकेबाजीची सुरुवात केली. लुईसने गॅरटॉनला एकाच षटकात 2 षटकार व एका चौकारासाठी पिटाळून लावत आणखी आक्रमणावर भर दिला. नंतर ख्रिस्तियनने जैस्वालला बाद करत ही जोडी फोडली. मिडऑफवरील सिराजने त्याचा झेल टिपला होता.
धावफलक
राजस्थान रॉयल्स ः इव्हिन लुईस झे. भरत, गो. गॅरटॉन 58 (37 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), यशस्वी जैस्वाल झे. सिराज, गो. ख्रिस्तियन 31 (22 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), संजू सॅमसन झे. पडिक्कल, गो. शाहबाज 19 (15 चेंडूत 2 चौकार), महिपाल लोमरोर यष्टीचीत भरत, गो. चहल 3 (4 चेंडू), लियाम लिव्हिंगस्टोन झे. डीव्हिलियर्स, गो. चहल 6 (9 चेंडू), राहुल तेवातिया झे. पडिक्कल, गो. शाहबाज 2 (3 चेंडू), रियान पराग झे. कोहली, गो. पटेल 9 (16 चेंडू), ख्रिस मॉरिस, झे. पडिक्कल, गो. पटेल 14 (11 चेंडूत 2 चौकार), चेतन साकरिया झे. डीव्हिलियर्स, गो. पटेल 2 (2 चेंडू), कार्तिक त्यागी नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 4. (लेगबाईज 1, वाईड 3). एकूण 20 षटकात 9 बाद 149.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-77 (जैस्वाल, 8.2), 2-100 (इव्हिन, 11.1), 3-113 (लोमरोर, 12.5), 4-113 (सॅमसन, 13.1), 5-117 (तेवातिया, 13.6), 6-127 (लिव्हिंगस्टोन, 16.2), 7-146 (रियान, 19.2), 8-146 (मॉरिस, 19.3).
गोलंदाजी ः जॉर्ज गॅरटॉन 3-0-30-1, मोहम्मद सिराज 3-0-18-0, ग्लेन मॅक्सवेल 2-0-17-0, हर्षल पटेल 4-0-34-3, ख्रिस्तियन 2-0-21-1, यजुवेंद्र चहल 4-0-18-2, शाहबाज अहमद 2-0-10-2.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली धावचीत पराग 25 (20 चेंडूत 4 चौकार), देवदत्त पडिक्कल त्रि. गो. मुस्तफिजूर 22 (17 चेंडूत 4 चौकार), श्रीकर भरत झे. बदली खेळाडू (अनुज रावत), गो. मुस्तफिजूर 44 (35 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), ग्लेन मॅक्सवेल नाबाद 50 (30 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), एबी डीव्हिलियर्स नाबाद 4 (1 चेंडू, 1 चौकार). अवांतर 8. (लेगबाईज 2, वाईड 6). एकूण 17.1 षटकात 3 बाद 153.
गडी बाद होण्याचा क्रम
1-48 (पडिक्कल, 5.2), 2-58 (विराट, 6.5), 3-127 (भरत, 15.6).
गोलंदाजी
ख्रिस मॉरिस 4-0-50-0, कार्तिक त्यागी 2-0-23-0, चेतन साकरिया 3-0-18-0, मुस्तफिजूर रहमान 3-0-20-2, राहुल तेवातिया 3-0-23-0, महिपाल लोमरोर 2-0-13-0, रियान पराग 0.1-0-4-0.