वृत्तसंस्था/ पॅरीस
डब्ल्यूटीए टूरवरील महिला एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने 13 व्या स्थानावर झेप घेतली असून तिने दुबई खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 9186 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
स्पेनच्या मुगुरूझाने तब्बल दोन वर्षांनंतर डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धा जिंकली. गेल्या शनिवारी मुगुरूझाने झेकच्या बिगर मानांकित क्रेजिकोव्हाचा पराभव करत दुबई खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या जेतेपदामुळे मुगुरूझाच्या मानांकनात तीन अंकांनी फरक पडला. यापूर्वी मुगुरूझा मानांकनात 16 व्या स्थानावर होती.
डब्ल्यूटीए टूरवरील महिला एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 9186 मानांकन गुणांसह पहिल्या, जपानची ओसाका 7835 गुणांसह दुसऱया, रूमानियाची हॅलेप 7255 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5760 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5370 गुणांसह पाचव्या, झेकची प्लिस्कोव्हा 5205 गुणांसह सहाव्या, अमेरिकेची सेरेना विल्ययम्स 4915 गुणांसह सातव्या, बेलारूसची साबालेन्का 4815 गुणांसह आठव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 4735 गुणांसह नवव्या, झेकची क्विटोव्हा 4571 गुणांसह दहाव्या, हॉलंडची बर्टेन्स 4505 गुणांसह अकराव्या, स्वीसची बेनसिक 4260 गुणांसह बाराव्या आणि स्पेनची मुगुरूझा 4235 गुणांसह 13 व्या स्थानावर आहे.