वृत्तसंस्था/ कोलंबो
लंका दौऱयावर असणाऱया भारतीय संघातील अष्टपैलू कृणाल पंडय़ाला कोरोनाची लागण झाल्याने मंगळवारी होणारा दुसरा टी-20 सामना एक दिवसाने लांबणीवर टाकण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी घेण्यात आलेल्या चाचणीत कृणाल पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून संघातील सर्वांचीच आरटी-पीसीआर टेस्ट घेण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नव्हता. ‘मंगळवारी 27 रोजी होणारा दुसरा टी-20 सामना एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आला असून बुधवारी 28 रोजी तो खेळविला जाईल,’ असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले. ‘मंगळवारी सकाळी सामन्याआधी सर्वच खेळाडूंची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली, त्यात कृणाल पंडय़ा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मेडिकल पथकाने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना शोधले असून संपूर्ण संघाची चाचणी घेतली जात आहे. सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच बुधवारचा सामना होऊ शकेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरा व तिसरा सामना आता लागोपाठ होणार असून गुरुवारी तिसरा व शेवटचा सामना खेळविला जाणार आहे. भारताने पहिला सामना 38 धावांनी जिंकून आघाडी घेतली आहे. गेला महिनाभर बायोबबलमध्ये कृणाल असल्याने त्याला कोरोनाची लागण कशी झाली, या विचाराने गोंधळ उडाला आहे. या घडामोडीमुळे पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांच्या इंग्लंड प्रयाणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या दोघांची इंग्लंडच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.