वृत्तसंस्था/ कँडी
येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरूद्धच्या दुसऱया क्रिकेट कसोटीवर शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर यजमान लंकेने आपली पकड अधिक मजबूत करताना 259 धावांची आघाडी मिळविली आहे.
या कसोटीत लंकेने 6 बाद 469 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी 159.2 षटकांत 7 बाद 493 धावांवर डावाची घोषणा केली. त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 83 षटकांत 251 धावांत आटोपल्याने लंकेने 242 धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर लंकेने दुसऱया डावात 2 बाद 17 धावा जमविल्या.
लंकेच्या पहिल्या डावात कर्णधार करूणारत्नेने 118, थिर्मेनीने 140, ओशादा फर्नांडोने 81, निशांकाने 30, डिक्वेलाने 72 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 77 तसेच रमेश मेंडीसने 2 चौकारांसह 33 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे तस्किन अहमदने 127 धावांत 4, मेहदी हसन, एस. इस्लाम, टी. इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बांगलादेशच्या पहिल्या डावाला तमीम इक्बाल आणि हसन यांनी समाधानकारक सुरूवात करून देताना 98 धावांची भागिदारी केली. तमीम इक्बालने 150 चेंडूत 12 चौकारांसह 92 तर हसनने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. तमीम इक्बालने कर्णधार मोमीनूल हकसमवेत तिसऱया गडय़ासाठी 52 धावांची भर घातली. मोमीनूल हकने 7 चौकारांसह 49 तर रहीमने 7 चौकारांसह 40 धावा जमविल्या. रहीम आणि मोमीनूल हक यांनी चौथ्या गडय़ासाठी 63 धावांची भागिदारी केली. बांगलादेशचे शेवटचे सहा गडी 35 धावांत बाद झाले. बांगलादेश पहिला डाव 83 षटकांत 251 धावांत आटोपला. लंकेचा प्रवीण जयविक्रमाने भेदक गोलंदाजी करत 92 धावात 6 गडी बाद केले. लकमल आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. लंकेने दुसऱया डावात 7 षटकांत 2 बाद 17 धावा जमविल्या. थिर्मेनी 2 तर ओ फर्नांडो एका धावेवर बाद झाले. कर्णधार करूणारत्ने 13 तर मॅथ्यूज 1 धावेवर खेळत आहे. बांगलादेशतर्फे मेहदी हसन आणि टी इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 159.2 षटकांत 7 बाद 493 डाव घोषित (करूणारत्ने 118, थिर्मेनी 140, ओशादा फर्नांडो 81, निशांका 30, डिक्वेला नाबाद 77, रमेश मेंडीस 33, तस्किन अहमद 4-127, मेहदी हसन, एस. इस्लाम, टी. इस्लाम प्रत्येकी एक बळी), बांगलादेश प.डाव 83 षटकांत सर्वबाद 251 (तमीम इक्बाल 92, हसन 25, मोमिनूल हक 49, रहीम 40, मेहदी हसन 16, प्रवीण जयविक्रमा 6-92, लकमल 2-30, रमेश मेंडीस 2-86), लंका दु. डाव- 7 षटकांत 2 बाद 17 (करूणारत्ने खेळत आहे 13, मॅथ्युज खेळत आहे 1, थिर्मेनी 2, फर्नांडो 1, मेहदी हसन 1-7, टी. इस्लाम 1-2).