प्रतिनिधी/ पणजी
लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी काल शनिवारीही गोव्यात सर्वत्र सामसूम दिसून आली. लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. कोरोनाचा फैलाव आता प्रचंड गतीने वाढत असल्याने लोक भयभीत झाले आहेत. रस्ते ओस पडले आहेत तर मार्केट परिसरात पूर्ण शांतता आहे. पाऊसही जोरदार पडल्याने त्याचा परिणाम जाणवला.
गोव्यात सर्वत्र मार्केट परिसरात शुकशुकाट दिसून आला. दुकानेही बंद ठेवण्यात आली. सकाळीच दूध, वृत्तपत्रे व अन्य जीवनावश्यक वस्तुंसाठी लोक बाहेर पडतात मात्र सकाळी आठ वाजल्यानंतर कुणीही बाहेर दिसत नाही. वाहतुकीसाठी सर्व सुविधा बंद आहेत. बस व अन्य प्रवासी वाहतूकही बंद आहे. शनिवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असते त्यामुळे वाहतूक कमीच असते मात्र लॉकडाऊन असल्याने खासगी वाहनांनाही विश्रांती दिली गेली आहे.
राजधानी पणजीत पूर्ण शुकशुकाट
राजधानी पणजीत काल शनिवारी दुसऱया दिवशी पूर्ण शुकशुकाट दिसून आला. मार्केट परिसर बंद आहे. त्याचबरोबर अन्य दुकानेही बंद आहेत. वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली असून रस्ते मोकळे आहेत. रस्त्यावरून फिरतानाही कुणी दिसत नाही. राजधानी पणजीच्या शेजारील चिंबल भागात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. कामराभाट, सांतईनेजबांध, इंदिरानगर येथे रुग्ण संख्या वाढल्याने लोक सावध झाले आहेत. खरेदीसाठीही लोक बाहेर पडत नाही.