मुख्य रस्त्यावर अडथळे निर्माण केल्याने वाहनधारकांना त्रास : टिळकवाडी परिसरातील रेल्वे फाटक देखील बंद
प्रतिनिधी / बेळगाव
बाजारपेठेतील विविध रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच मुख्य रस्त्यावर अडथळे निर्माण करून टिळकवाडी परिसरातील रेल्वे फाटक देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱया रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने क्लोजडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरातील रहदारी आणि अनावश्यक फिरणाऱयांना ब्रेक लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावून बाजारपेठेत जाणाऱयांना ब्रेक लावण्यात आला आहे. तसेच गोगटे चौक येथे बॅरिकेड्स लावून रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
एकच फाटक खुले असल्याने गैरसोय
मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पहिले रेल्वे फाटक आणि तिसरे रेल्वे फाटक येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ दुसरे रेल्वे फाटक खुले ठेवण्यात आले आहे. पण एकच फाटक खुले असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रेल्वे गाडी आल्यास वाहतूक कोंडी होत असून रस्त्यावर रांगा लागत आहेत. त्यामुळे याबाबत विचार करणे गरजेचे आहे. शहरात क्लोजडाऊन असले तरी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरविण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक बाजारपेठेत ये-जा करीत असल्याने दुसऱया रेल्वे फाटकावर गर्दी होत आहे. त्यामुळे पहिले रेल्वे फाटक खुले करावे अशी मागणी होत
आहे.