पुसेगाव / वार्ताहर :
करंजओढा (बुध) येथे 2015 साली स्वातंत्र्य दिनादिवशी दिवसाढवळ्या दुहेरी खून करून फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांच्या अधिनस्त पथकाने पोलादपूर येथे मोठ्या शिताफीने अटक केली.
रायसिंग शंकर जाधव रा. करंजओढा, बुध (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुध गावाजवळ करंजओढा येथे सन 2015 च्या स्वातंत्र्य दिनी दिवसाढवळ्या दुहेरी खून झाला होता. या गुन्ह्यातील 11 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी फरार झालेला रायसिंग जाधव हा मागील 6 वर्षापासून वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पोलादपूर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांच्या अधिनस्त पथकाने जेरबंद केले.