ज्यो बिडेन यांना 3.43 हजार कोटींची देगणी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 1.03 हजार कोटींनी मागे
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार ज्यो बिडेन यांना आतापर्यंत 466 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 3.43 हजार कोटी रुपये) देणगी मिळाली आहे. पक्षाने बिडेन यांना डोनाल्ड ट्रम्प विरोधात उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांचे निधीसंकलन अत्यंत कमी होते.
प्रारंभिक काळात बिडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा 187 दशलक्ष डॉलर्सने (सुमारे 1.37 हजार कोटी रुपये) मागे होते. परंतु निधीसंकलनात आता बिडेन यांनी ट्रम्प यांना मागे टाकले आहे. बिडेन आता ट्रम्प यांच्यापेक्षा 141 दशलक्ष डॉलर्सनी (सुमारे 1.03 हजार कोटी रुपये) आघाडीवर आहेत. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 325 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 2.39 हजार कोटी रुपये) निधीसंकलन करता आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रुथ बेडर गिन्सबर्ग यांच्या मृत्यूनंतर डेमोक्रेटिक पार्टीला देणगीदारांनी विक्रमी निधी दिला आहे. लोकांनी केवळ 24 तासांमध्ये डेमोक्रेटिक उमेदवारांसाठी 90 दशलक्ष डॉलर्स (662 कोटी रुपये) दिले आहेत.
गिन्सबर्ग यांच्या मृत्यूनंतर 28 तासांमध्ये देणगीदारांनी डेमोक्रेटिक उमेदवारांसाठी 91.4 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला असून हा एक विक्रमच आहे. देणगीदारांनी केवळ शनिवारीच डेमोक्रेटिक पार्टीला 70 दशलक्ष डॉलर्स दिले होते. तर शुक्रवारी रात्री एका तासात 6.3 दशलक्ष डॉलर्सचा निधी उपलब्ध केला होता अशी माहिती ऑनलाईन निधी जमविणारी संघटना ऍक्टब्ल्यूकडून देण्यात आली आहे.
समाजमाध्यमांवर खर्च
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षीय निवडणूक महामारीच्या काळात होत आहे. महामारीमुळे लोक फारच कमी प्रमाणात घरातून बाहेर पडत आहेत. प्रचाराचे प्रमाणही तुलनेत कमी आहे. याचमुळे राजकीय पक्ष अधिकाधिक रक्कम टीव्हीऐवजी समाजमाध्यमांवर खर्च करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे पक्षांनी रेडिओ आणि टीव्हीवरील जाहिरातीही कमी केल्या आहे. अखेरच्या दीड महिन्यांमध्ये मोठा खर्च होणार असून याकरता ऑनलाईन निधीसंकलन वाढणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.
उद्योगपती सरसावले
एका दिवसात मिळणाऱया रकमेचा मागील विक्रम 41.6 दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे 306 कोटी रुपये) आणि एका तासात मिळणाऱया रकमेचा मागील विक्रमी 4.3 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 31.66 कोटी रुपये) होता, हे दोन्ही विक्रम मोडीत निघाल्याचे ऍक्टब्ल्यूचे संचालक एरिन हल यांनी सांगितले आहे. बिडेन यांना निधी पुरविणाऱयांमध्ये त्यांचे समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते आणि कनिष्ठ वर्गापासून दिग्गज उद्योगपती सामील आहेत.