विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने यंदाच्या 13 व्या हंगामातील पहिली लढत सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळली, त्यावेळी एका खेळाडूने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चक्क 8 व्या प्रँचायझीतर्फे खेळण्याचा पराक्रम केला आणि तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार ऍरॉन फिंच!
ऍरॉन फिंचने 2010 मध्ये आयपीएल पदार्पण केले. तेथे त्याने उद्घाटनाच्या स्पर्धेतील विजेते राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व केले. नंतर 2011 व 2012 मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. आता बरखास्त असलेल्या पुणे वॉरियर्स प्रँचायझीचे त्याने नेतृत्वही केले. त्यानंतर पुन्हा लिलावात उतरतल्यानंतर त्याला सनरायजर्स हैदराबादने 2014 च्या हंगामासाठी करारबद्ध केले तर 2015 मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला.
2016 च्या हंगामासाठी गुजरात लायन्सने त्याला करारबद्ध केले. पण, प्रँचायझीचीच स्पर्धेतून ‘एक्झिट’ झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा लिलावात उतरणे भाग होते. 2018 च्या हंगामात त्याने किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व केले. 2019 मध्ये मात्र त्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेणे पसंत केले. वनडे विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागील लिलावात त्याला विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीने करारबद्ध केले आणि अशा रितीने फिंच आयपीएल इतिहासात चक्क 8 संघांकडून खेळला!
फिंचचा आयपीएल प्रँचायझींचा इतिहास
2010 : राजस्थान रॉयल्स
2011 व 2012 : दिल्ली डेअरडेव्हिल्स
2013 : पुणे वॉरियर्स
2014 : सनरायजर्स हैदराबाद
2015 : मुंबई इंडियन्स
2016 व 2017 : गुजरात लायन्स
2018 : किंग्स इलेव्हन पंजाब
2020 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर