वार्ताहर/ ताम्हाने
रोपांना घातलेले पाणी अंगणात आल्याच्या रागातून वृद्ध दांपत्याला मारहाण व ठार मारण्याची धमकी देणाऱया संशयिताविरुद्ध देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी रामचंद्र कदम (रा. रोहिदास आळी, देवरूख, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. 25) सकाळी साडेआठ वाजता रोहिदास आळी-देवरूख येथे घडली.
सुशीला चंद्रकांत कदम (वय 60, रा. रोहिदासआळी, देवरूख, ता. संगमेश्वर) हे व संशयित एकमेंकाचे शेजारी आहेत. सुशीला यांनी अंगणातील रोपांना घातलेले पाणी संशयित रवी यांच्या अंगणात आले. या रागातून शिवीगाळ केली. काहीतरी बडबडू नकोस पाणी गेले ते पंच बोलावून मला दाखव, असे सुशीला यांनी सांगितले.
याचा राग मनात धरुन रवीने त्यांच्या घरात येऊन सुशीला यांचे पती चंद्रकांत संगु कदम (वय 65) यांना काठीने मारहाण केली. तर सुशीला यांनाही मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.