वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अव्वल फुटबॉलपटू रॉय कृष्णा बरोबरच्या करारात एटीके-मोहन बगान फुटबॉल क्लबने एक वर्षासाठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता रॉय कृष्णा पुढील वर्षी होणाऱया सातव्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामापर्यंत एटीके – मोहन बगान संघातून खेळणार आहे.
इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेतील विद्यमान विजेता मोहन बगान क्लब अगामी फुटबॉल हंगामात एटीके-मोहन बगान या नावाने सहभागी होईल. मोहन बगान क्लबमध्ये आय लिग विजेता एटीके क्लब विलीन झाला आहे. 32 वर्षीय रॉय कृष्णाने 2019-20 च्या इंडियन सुपरलिगच्या हंगामात दर्जेदार कामगिरी करताना 15 गोल नोंदविले. एटीके क्लबचे त्याने गेल्या हंगामात प्रतिनिधीत्व केले होते. रॉय कृष्णाच्या दर्जेदार कामगिरीमुळे एटीके क्लबने तिसऱयांदा आय लिग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. एटीके क्लबने आपल्याला करारात मुदतवाढ दिल्याबद्दल रॉय कृष्णाने क्लबचे आभार मानले आहेत.
2007 साली रॉय कृष्णाने फिजी येथून भारतात प्रवेश केल्यानंतर आपले आंतरराष्ट्रीय फुटबॉल पदार्पण केले. फिजी संघाकडून त्याने 40 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले होते. लिग स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत त्याने गेल्या फुटबॉल मौसमात सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूमध्ये दुसरे स्थान मिळविले होता. आयलिग स्पर्धेतील अंतिम सामन्यात एटीकेने चेन्नयीन एफसी संघाचा 3-1 असा पराभव करून जेतेपद मिळविले होते. आगामी फुटबॉल हंगामात रॉय कृष्णा हा एटीके -मोहन बगान संघातील महत्वाचा फुटबॉलपटू राहिल.