मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदविस वाढत आहे. या संकटाच्या काळात कोणत्या कोणत्या कारणावरून विरोधक आणी राज्य सरकार यांच्यात आरोपाची मालिका सुरूच आहे. सध्या सोशल मीडियावर विधानसभेचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याचा कोरोना लस घेतल्याचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. काँग्रेसने देखील यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच नेटकऱ्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर या कारणावरून टीकेची झोड उठवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच फोटोवरून आता महाराष्ट्र काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, असा सवालच काँग्रेसनं उपस्थित केलाय. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!, काँग्रेसनं ट्विट करत अशी टीका केली आहे.
तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?, असे प्रश्न काँग्रेसने ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
का होत आहे टीका ?
माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा तन्मय फडणवीस नातू आहे. त्याचे वय 25 वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने कोरोना लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. परंतु विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते.