क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
दुसऱया सत्रात दहा खेळाडूंनीशी खेळणाऱया ईस्ट बंगालने जबरदस्त झुंज देताना एफसी गोवाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. वास्कोतील टिळक मैदानावर आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील या लढतीत खरे म्हणजे एफसी गोवाने पराभवाच्या नामुष्कीतून आपली सुटका करून घेतली असे म्हणावे लागेल. दुसऱया सत्रात ईस्ट बंगालच्या ब्राईटने एक अफलातून गोल करून संघाला आघाडीवर नेले होते. मात्र लगेच देवेंद्र मुरगावकरने हेडरवर गोव्याचा गोल बाद केला. एफसी गोवाच्या विजयाच्या मार्गावरील प्रमुख अडसर राहिला तो ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार. या गोलरक्षकाने प्रामुख्याने गोव्याचे पहिल्या सत्रात किमान तीन गोल अडविले.
या बरोबरीने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. एफसी गोवाचे 10 सामन्यांतून चार विजय, तीन बरोबरी आणि तीन परावाने आता 15 गुण झाले आहेत. ईस्ट बंगालचा हा नवव्या सामन्यातील चौथा ड्रॉ ठरला. त्यांचे आता एक विजय आणि चार पराभवाने 7 गुण झाले आहेत.
पहिल्या सत्रात ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदारच्या अभेद्य गोलरक्षणामुळे एफसी गोवाला गोल नोंदविता आला नाही. त्याने या सामन्यात आणि प्रामुख्याने पहिल्या सत्रात अफलातून गोलरक्षण करताना संघावर होणारे गोल वाचविले. सामन्याच्या पहिल्या सत्रातील पाचव्या मिनिटाला एफसी गोवाचा होणारा गोल देबजितच्या उत्कृष्ट गोलरक्षणाने होऊ शकला नाही. यावेळी ब्रँडन फर्नांडिसने घेतलेल्या फ्रिकीकवर जेम्स डोनाचीने घेतलेला हेडर देबजित अडविला.
चारच मिनिटांनी जॉर्गे ऑर्तिज मेंडोंझाने दिलेल्या पासवर आलेक्सझांडर जेसुराजचा गोल करण्याचा प्रयत्न ईस्ट बंगालचा बचावपटू मॅट्टी स्टिनमॅनने ऐनवेळी केलेल्या बचावामुळे वाया गेला. त्यानंतर एफसी गोवाची आक्रमणांची मालिका चालूच राहिली. बाराव्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडिसने उजव्या बगलेतून एक चाल रचली. त्याने प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालचा बचाव भेदून केलेल्या क्रॉसवर ताबा मिळविण्यात गोव्याचे स्ट्रायकर अपयशी ठरले.
ईस्ट बंगालने आपली सामन्यातील पहिली धोकादायक चाल पहिल्या सत्रातील मध्याला केली. मात्र यावेळी नारायण दासच्या पासवर अमादी ऍरोनचा हेडर निष्फळ ठरला. त्यानंतर 36व्या आणि 39व्या मिनिटाला गोलरक्षक देबजित मजुमदारने सावियर गामा आणि जॉर्गे ऑर्तिझ मेंडोंझाचे लागोपाठ दोन फटके अडविले. मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना सुद्धा देबजितने परत एकदा आपलं कौशल्य सिद्ध करताना एफसी गोवाचा कप्तान एदू बेडियाचा गोल करण्याचा यत्न उधळून लावला.
दुसऱया सत्रात 56व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा कप्तान डॅनियल फॉक्सला रेड कार्ड पडल्याने मैदान सोडावे लागले. यामुळे उर्वरीत वेळ ईस्ट बंगालला दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. एफसी गोवाने दुसऱया सत्रात ब्रँडन फर्नांडिस, जेम्स डोनाची आणि आलेक्सझांडर जेसुराजच्या स्थानावर आल्बेर्तो नोगुएरा, ऐबान डोहलिंग आणि देवेंद्र मुरगावकर यांना संधी दिली.
सामन्याच्या 79व्या मिनिटाला ईस्ट बंगालने गोल करून एफसी गोवाला धक्का दिला. इनोबखारे ब्राईटने नोंदविलेला गोल तर प्रेक्षणीय होता. त्याने जॅक्स मघोमाकडून मिळालेल्या पासचे सोने करताना प्रथम चार बचावपटूंना व नंतर गोलरक्षक मोहम्मद नवाजला भेदले आणि चेंडू जाळीत मारला. मात्र ईस्ट बंगालची ही आघाडी केवळ दोनच मिनिटे टिकली.
डाव्या बगलतून सावियर गामाकडून मिळालेल्या क्रॉसवर एक भेदक हेडर मारून देवेंद्र मुरगावकरने एफसी गोवाला बरोबरीत आणले.