कायदा व महसूल खात्याचा संयुक्त उपक्रम
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्यात ‘प्रॉपर्टी रजिस्ट्रार’ची स्थापना करण्यात आली असून असे रजिस्ट्रार असणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावा कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी केला आहे.
कायदा खाते आणि महसूल खाते यांनी संयुक्तपणे हे रजिस्ट्रार साकार केले असून सर्व सरकारी खाती व जनतेला त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. मालमत्तेची खरेदी – विक्री व इतर तपशील हवा असल्यास तो मिळणार आहे. प्रत्येक सरकारी खात्यांना एक कोड नंबर देण्यात आला असून तिथे ऑनलाईन पद्धतीने पाहणी केल्यानंतर संबंधित मालमत्तेची वीज, पाणी थकबाकी याचीही माहिती कळणार असल्याचे ते म्हणाले.
सर्व मालमत्तेची नोंद या रजिस्ट्रारमध्ये करण्यात आली असून कायदा – महसूल खात्याने रजिस्टारची संकल्पना साकार केल्याची माहिती काब्राल यांनी दिली. मालमत्तेचे म्युटेशन करण्याचे अधिकार सब-रजिस्ट्रारना देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मालमत्तेची किती वेळा खरेदी – विक्री झाली आणि कोणाकडे झाली याचा संपूर्ण तपशील कोणालाही त्या प्रॉपर्टी ‘रजिस्ट्रार’मधून मिळणार असल्याचे काब्राल यांनी नमूद केले. मालमत्तेचा कारभार त्यामुळे अधिक पारदर्शक होईल आणि जनतेला तो पाहण्यास खुला राहणार आहे, अशी माहिती काब्राल यांनी दिली.