दिल्लीत एकाच इमारतीमध्ये 41 जण पॉझिटिव्ह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ कायम असून शनिवारी एकुण रूग्णसंख्या 37 हजार 412 एवढी झाली. मागील 24 तासांमध्ये दोन हजार 293 नवे रूग्ण आढळले. 71 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1218 झाली आहे. एकुण रूग्णसंख्येपैकी 26 हजार 167 जणांवर उपचार सुरू आहेत. 9951 जण पूर्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
41 जण पॉझिटिव्ह आढळल्याने दिल्लीतील खळबळ
दिल्लीतील कापसहेडा परिसरातील एका इमारतीमधील 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. 18 एप्रिल रोजी या इमारतीमधील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर या इमारतील टाळे ठोकण्यात आले. येथील 176 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. 11 दिवसांनंतर सरकारने यातील 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले. हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
देशभरात 9951 रूग्ण पूर्ण बरे
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. मागील 24 तासांमध्ये 961 जण पूर्ण बरे झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार देशात 9951 जण कोरोनामुक्त झाले आहेत.