संसदीय समितीचा अहवाल : आरोग्य मंत्रालयाचे दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अवयव प्रत्यारोपण, हृदय किंवा मेंदूवरील शस्त्रक्रिया तसेच अन्य गंभीर आजारांच्या उपचारासाठी लोकांना मोठय़ा शहरांच्या दिशेने धाव घ्यावी लागते. यामागील कारण देशातील तज्ञ डॉक्टर्सची वानवा हेच आहे. एका अनुमानानुसार केवळ 6 मोठय़ा विभागांमध्येच 3 लाखांहून अधिक तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. संसदेच्या एका समितीने अहवाल सोपविला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशात तज्ञ डॉक्टरांची किती कमतरता आहे याचे अध्ययनच केले नसल्याचे अहवालात नमूद आहे. देशात डॉक्टर विशेषकरून तज्ञांची कमतरता दूर करण्यासाठी विशेषकरून ग्रामीण भागाच्या गरजा पाहता महाराष्ट्र मॉडेलचे अध्यन करण्याची सूचना अहवालात आहे.
पीडियाट्रिकमध्ये 2 लाख तज्ञांची कमतरता
देशाच्या प्रमुख तज्ञांनी संसदीय समितीसमोर डॉक्टरांशी संबंधित मांडलेली स्थिती चकित करणारी आहे. कार्डियोलॉजीमध्ये 8,800, चेस्ट मेडिसीनमध्ये 23 हजार, न्यूरोलॉजीमध्ये 5 हजार 200, पीडियाट्रिकमध्ये 2 लाख 30 हजार, एंडोक्रिनोलॉजीमध्ये 27 हजार 900 आणि नेफ्रोलॉजीमध्ये 40 हजारांहून अधिक तज्ञांची कमतरता आहे. मोठय़ा प्रमाणावर तज्ञ डॉक्टरांचा अभाव असतानाही मागील 5 वर्षांत 3 हजार 270 तज्ञ आणि 6 हजार 640 जनरल डय़ुटी मेडिकल ऑफिसर्सच्या नव्या नियुक्त्या होऊ न शकल्याचे समितीला आढळून आले आहे. यादरम्यान दिल्लीत केवळ 2 नव्या तज्ञांची नियुक्ती झाली आहे.