कोरोना महामारीचा प्रभाव : कुंभमेळाक्षेत्रात यंदा केवळ 5 संपर्क सेतूंची उभारणी होणार
वृत्तसंस्था / हरिद्वार
कोरोना महामारीचा प्रभाव 2021 मध्ये हरिद्वार येथे होणाऱया कुंभमेळय़ावरही पडणार आहे. महामारीमुळे मेळय़ात सोशल डिस्टन्सिंगसह लाखो लोकांना पवित्र स्नानाची संधी मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच कृत्रिम घाटांचाही वापर होणार आहे. कुंभमेळय़ात तीन मोठी कोविड देखभाल केंद्रेही निर्माण करण्यात येणार आहेत.
तात्पुरत्या घाटांच्या सुरक्षेसाठी डीप वॉटर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. तर मेळाक्षेत्राला परस्परांमध्ये जोडण्यासाठी यंदा तीन ठिकाणी केवळ 5 तात्पुरते सेतू निर्माण करण्यात येणार आहेत. मागील कुंभमेळय़ात 18 ठिकाणी 32 सेतू उभारण्यात आले होते.
जानेवारीपर्यंत निर्मिती
मेळय़ात तात्पुरते सेतू मेळाक्षेत्राच्या मुख्य वाहनतळांना विविध स्थानांसाठी जोडण्यासाठी निर्माण केले जातात. दोन सेतू बैरागी शिबिराला गौरीशंकरला जोडण्यासाठी तयार केले जाणार आहेत. नीलधारेला चंडीघाटाशी जोडण्यासाठी दोन सेतू निर्माण होणार आहेत. चंडीदेवी रोपवेपासून गौरीशंकरला जोडण्यासाठी पादचाऱयांसाठी सेतू निर्माण केला जाणार आहे.
नीलधारा आणि बैरागी शिबिरात कुंभमेळा भरणार आहे. मेळाक्षेत्रात रस्ते, पाणी, वीजेची कामे सुरू झाली आहेत. गरज असलेल्या ठिकाणीच सेतू उभारण्यात येतील. कोरोनाबाधितांसाठी वाहनतळात देखभाल केंद्र निर्माण करण्याचीही तयारी आहे. घाटांवर प्लास्टिकने तयार पाण्यावर तरंगणारी बचावस्थानके निर्माण होतील.
मर्यादित संख्येत तंबू
कुंभमेळय़ाचे प्रमुख आकर्षण शेकडो चौरस मीटरमध्ये उभारण्यात आलेल्या तंबूंचे असते. यात आखाडय़ासह भाविकही वास्तव्यास असतात. तर प्रशासन, पोलीस, रुग्णालय आणि महनीयांसाठीही तंबू उभारले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे तंबू मर्यादित संख्येत उभारले जाणार आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरि महाराज यांच्यानुसार उत्तराखंड सरकार पूर्वी तंबूंना मंजुरी देण्यात तयार नव्हते, परंतु आता सहमती झाली आहे. फेब्रुवारीत कोरोनाचा प्रकोप वाढल्यास स्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. तर कुंभमध्ये आखाडय़ांच्या तंबूंवर कुठलेच बंधन नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.