30 मे रोजी केरळमध्ये येणार, अमेरिकेच्या वेदर कंपनीचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात यंदा मान्सूनच्या पावसाला अनुकुल वातावरण असून सामान्य ते जादा असे प्रमाण राहू शकते. यंदा पाऊस 30 मे रोजी केरळच्या तटवर्ती प्रदेशात दाखल होईल, असा अंदाजही अमेरिकेच्या वेदर कंपनीने वर्तवला आहे.
कंपनीच्यावतीने प्रथम प्रसारित केलेल्या अंदाजात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात तापमान 40 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. तर काही ठिकाणी हा आकडा 45 अंशाच्या आसपास राहू शकतो. यंदा आतापर्यंत मध्यप्रदेशातील खरगोन जिल्हय़ात मंगळवारी 45 अंशाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमनामध्ये उशीर होत असला तरी यंदा मात्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील अल निनोच्या तापमानावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अल निनोवर भारताचा मान्सून अवलंबून असतो, असे मानले जाते. तर ला नीनोचा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होत असतो. हिंदी महासागरातील जलक्षेत्र थंड राहिले तर यंदा 110 टक्के पाऊस होऊ शकतो, असे या अंदाजात म्हटले आहे. तर भारतीय हवामान विज्ञान संस्थेनेही याआधीच्या अंदाजात यंदा पाऊस चांगला राहिल, असे म्हटले होते. या संस्थेच्यावतीने एप्रिल अखेर दीर्घकालीन अंदाज व्यक्त करण्यात येतो.