नरेश गावणेकर/ फोंडा
स्व:रक्षण, आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती व बळकट शरीरासाठी कराटे प्रशिक्षण घेऊन युवापिढीने व्यक्तीमत्व विकास घडवावा. ग्रामीण भागातील मुलांना खासकरुन मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन युवा पिढी शक्तीवान करण्याचा कराटे मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक (ब्लॅक बेल्ट 5 डॅन) यांचा संकल्प आहे. युवा पिढी सक्षम, निर्व्यसनी व ताकदवान व्हावी यासाठी ते कार्य करतात. युवा पिढी बलवान झाली तर देश बलवान होईल असे ते मानतात.
मुळ कुळे-शिगांव येथील विष्णू नाईक हे होंडा येथे स्थायिक झाले असून ओकीनावा मार्शल आर्ट अकादमीतर्फे ते गोव्यातील अनेक ठिकाणी कराटे वर्ग घेतात. त्यांचे मुख्य केंद्र सिकंदराबाद येथे असून तेथील प्रमुख ग्रँडमास्टर एस. श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रशिक्षण देत आहेत. वाळपई, सत्तरी, डिचोली, कुंकळय़े-म्हार्दोळ, फोंडा, पेडणे, सांगे, धारबांदोडा आदी ठिकाणी त्यांचे वर्ग चालतात. सिंधुदुर्ग, सावंतवाडी येथेही त्यांनी वर्ग घेतले आहे. 1995 पासून कुळे-शिगांव येथून त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आज त्यांनी तयार केलेले प्रशिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी प्रशिक्षण देतात. वर्गात दाखल झाल्यानंतर मुलांना आवश्यक ते व्यायाम व कराटे तंत्र शिकवले जाते. त्यांच्या प्रगतीनूसार चाचणी घेऊन विविध बेल्ट दिले जातात. यलो, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू , मरुन, ब्राऊन, ब्राऊन-ब्लॅक व शेवटचा ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात येतो. ब्लॅक बेल्ट मिळवण्यासाठी अथक मेहनत व खडतर परीक्षा द्यावी लागते. ब्लॅक बेल्ट नंतरही 1 ते 10 डॅन अशी प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. विष्णू नाईक यांनी तयार केलेल्या कराटेपटूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करुन अनेक पदके पटकावली आहे. गोवा क्रीडा प्राधिकरण, स्कूल गेम्स ऑफ इंडिया, कराटे असोसिएशन ऑफ इंडिया व टेडीशनल कराटे असोसिएशन गोवाच्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विष्णू नाईक यांनी स्वत: 5 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाचे प्रतिनिधीत्व करुन 4 वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल दूधसागर पर्लस कुळेतर्फे तत्कालीन मंत्री विनय तेंडुलकर तर गतसाली कुंकळय़े-म्हार्दोळ येथे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते तसेच इतर ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे.
प्रशिक्षणार्थी पोलीस खात्यात
विष्णू नाईक यांच्या प्रशिक्षणाखाली कराटे प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण आज पोलीस खात्यात नोकरी करीत आहे. अजित उमर्ये, प्रगती मळीक, अनंत गांवकर हे उपनिरीक्षक आहेत. प्रशांत राणे हा सीमासुरक्षा दलात सेवा करीत आहे. विष्णू नाईक यांनी अनेक प्रशिक्षकही तयार केले आहेत. सुरेखा कुंकळय़ेकर यापैकी एक महिला प्रशिक्षक असून ती कुंकळय़े-म्हार्दोळ येथे कराटे प्रशिक्षण देत आहे. या सर्वांचा गेल्यावर्षी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
कराटेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांच्या संस्थेतर्फे साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात येत असतात. पोटावरुन जीप तसेच ट्रीपलसीट मोटारसायकल चालवणे, फायरींग फॉल, बर्फ व टाईल्स फोडणे, लाठी चालवणे, हल्लेखोरापासून स्वरक्षण करणे इत्यादी साहसी व थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात येत असतात. यातून कराटेपटूंचा आत्मविश्वास वाढतो व स्वत:च्या ताकदीची परीक्षा होते असे विष्णू नाईक सांगतात.
ग्रामीण भागात जास्त लक्ष
शहरात अनेक ठिकाणी कराटे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातील मुलांना तेथे जाऊन प्रशिक्षण घेणे सोयीचे होत नाही. यासाठी आम्ही ग्रामीण भागात जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. यात मुलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभतो. सध्या लॉकडाऊनमुळे वर्ग घेतले जात नाही. मुलांना घरीच सराव करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर वर्ग सुरु करण्यात येईल. विमा एजंट असलेले विष्णू नाईक हे सर्व केंद्रावर लक्ष ठेऊन असतात. प्रत्येक ठिकाणी जाऊन ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तरुणांनी उगीच वेळ वाया घालवण्यापेक्षा कराटे वर्गात प्रवेश घ्यावा असे ते सांगतात. कराटे वर्ग घेऊन जास्त आर्थिक कमाई होत नाही. तरीपण लोकसंपर्क होतो. मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना चांगला मार्ग दाखवून व्यक्तीमत्व विकास घडवता येतो. देशाला बलवान युवा पिढी देण्याचे कार्य घडते. हेच आमचे समाधान असे विष्णू नाईक म्हणतात.