कोरोना व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या भारतात कमी करून सांगितली जाते, असा आरोप केला जात आहे. अधिकृतरीत्या भारतात जाहीर केलेल्या कोरोना मृतांच्या संख्येपेक्षा खरी आकडेवारी तिप्पट मोठी असावी, असेही एक अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, फक्त भारतातच असे होत आहे, अशी समजूत करून घेणे चुकीचे ठरेल. तथापि, अतिप्रगत आणि वैद्यकीय आकडेवारी घोषित करण्यात खोटारडेपणा न करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतही कोरोना मृत्यूंची संख्या कमी करून सांगितल्याचा प्रकार उघड झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत किमान 3 लाख 40 हजार कोरोना मृत्यूंची नोंद झालेली नाही, असे दिसून येते. कोरोना मृत्यू लपविलेल्या सहा देशांमध्ये रशियातील परिस्थिती सर्वात वाईट आहे. तर सर्वात प्रामाणिक आकडेवारी ब्रिटनने घोषित केली आहे, असेही सर्वेक्षणात आढळून आले आहे.
भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता मृत्यूंचे ‘अंडर रिपोर्टिंग’ फारशी आश्चर्याची बाब मानली जात नाही. कारण अनेकदा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे किंवा कुठल्या रोगामुळे, हे समजूही शकत नाही. लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्या करण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे असे होऊ शकते. तथापि, अमेरिकेत जेथे चाचण्यांचे प्रमाण खूप मोठे आहे, तेथेही असे ‘अंडर रिपोर्टिंग’ होणे ही आश्चर्याची आणि चिंतेची बाब मानली जात आहे. कोरोनाकाळात जगातील सर्वच देशांमध्ये मृत्यूदर वाढल्याचे दिसून येते. कारण बहुतेक साऱया देशांच्या आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतल्यामुळे इतर रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी इतर विकारांमुळे मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येतही वाढ होताना दिसते. त्यामुळे देश विकसनशील असो किंवा विकसित, कोरोनाने त्याच्या नाकीनऊ आणले आहे, हेच सिद्ध होते.