घरोघरी पूजा करण्यास न जाण्याचा काही पुरोहितांचा निर्णय
वार्ताहर / दोडामार्ग:
यंदाच्या गणेशोत्सवात दोडामार्ग शहरातील गणपती बाप्पांच्या पूजेवेळी भटजींची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणार आहे. पौरोहित्य करणाऱया दोडामार्गातील शरद मणेरीकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे रविवारी स्पष्ट केले. यामुळे अनेक गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या पूजेसाठी कॅसेट किंवा पूजेच्या पुस्तकाचा आधार घ्यावा लागणार आहे.
कोरोनाने थैमान घातल्याने सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अनेकजण आपआपल्या वैयक्तिक पातळीवर सोशल डिस्टन्सिग, सॅनिटायझर वापर वगैरेद्वारे काळजी घेत आहेत. शासन व आरोग्य विभाग यांच्या सूचनांचे पालन करत अनावश्यक गर्दी टाळल्यावर सार्वजनिक तसेच अन्य ठिकाणी भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरातील पुरोहित शरद मणेरीकर यांनी यंदाच्यावर्षी घरोघरी जाऊन गणपती मूर्तीचे पूजन टाळण्याचे ठरविले असल्याचे रविवारी सांगितले. कोरोनामुळे उद्भवलेली सध्याची परिस्थिती पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दरवर्षी दोडामार्ग शहर परिसरात आपल्याद्वारे साधारणतः 20-22 पुरोहितांच्या माध्यमातून गणपती पूजन केले जाते. गेल्या कित्येक वर्षापासून हे कार्य अविरतपणे सुरू आहे. मात्र, यंदाची परिस्थीत पूर्णतः वेगळी आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा धोका गृहित धरला जात आहे. ते पाहता संसर्गजन्य म्हणून ओळख झालेल्या या कोरोनाचा धोका अनेक व्यक्तींचा सहवास व संपर्कामुळे होऊ शकतो. बाहेरील ठिकाणाहून येणारे चाकरमानी तसेच पूजाअर्चा, आरती वैगरे यावेळी होऊ शकणारी गर्दी याचे विचार करता आपल्यामुळे कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून यंदाच्या वर्षी हा निर्णय घेतल्याचे मणेरीकर म्हणाले.
दरम्यान, दोडामार्ग शहरासोबत तालुक्यातील बऱयाच गावातील अन्य पुरोहितांनी देखील यंदाच्या गणेश उत्सवात घरगुती, सार्वजनिक गणपतींचे पूजन टाळणार असल्याचे स्पष्ट केले. आयनोडे पुनर्वसन सोबत अन्य बऱयाच गावांमध्ये पौरौहित्य करणारे मंदार प्रकाश जोशी यांनी देखील यंदाच्या चतुर्थीमध्ये आपण घरोघरी जाऊन पूजा करण्याचे टाळणार आहे, असे स्पष्ट करीत सर्व गणेश भक्तांनी यावर्षी आरोग्य विषयक सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे त्यांनी आवाहन केले.