दोडामार्ग – वार्ताहर-
वझरे येथील वेदांत कंपनीतर्फे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला हृदयनिरीक्षण यंत्र, ह्युमिडीफायर, ऑक्सिजन फ्लोमीटर देण्यात आले. कंपनीच्या सामाजिक विकास उपक्रमाचा एक भाग म्हणून या वस्तू देण्यात आल्याचे कंपनीचे अधिकारी आशिष पिळणकर म्हणाले.
कोव्हिड काळात अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक वगैरे यांना अनेक प्रकारची मदत कंपनीतर्फे गतवर्षी तसेच यंदाही करण्यात आली आहे. कंपनीतर्फे अनेक कार्यक्रम उपक्रम देखील सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविले जात आहेत. वझरे येथे मागील महिन्यात तेथील शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले होते. तसेच दोडामार्ग येथील कोव्हिड सेंटरला मास्क शिवाय अन्य सामग्री देखील देण्यात आली होती. गुरुवारी कंपनीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कंपनीतर्फे यावेळी एक हृदयनिरीक्षण यंत्र, ह्युमिडीफायरसह, दहा ऑक्सिजन फ्लोमीटर दिले. डॉ. एवळे यांनी कंपनीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले यावेळी कंपनीचे अधिकारी प्रणय वालावळीकर, मिलिंद बांदेकर, आशिष पिळणकर व वझरे सरपंच लक्ष्मण गवस उपस्थित होते.