दोडामार्ग / वार्ताहर:
सरपंच सेवा संघाच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी कुंब्रल गावचे सरपंच प्रवीण परब यांची आज एकमताने निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष पदी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, परमे सरपंच आनंद नाईक व कोलझर सरपंच उर्मिला देसाई तर सचिव पदी कुडासे खुर्द च्या सरपंच संगीता देसाई यांचीही निवड झाली. येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल मध्ये दोडामार्ग तालुक्यातील सर्व सरपंचाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हे बाहेर गावी असल्याने जिल्हा संघटक तथा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. श्री देसाई यांच्या सूचनेनुसार दोडामार्ग तालुका सरपंच तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या बैठकित आपले सरकार, स्ट्रीट लाईट बिल तसेच अन्य बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. श्री. गावडे यांनी श्री. परब यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. तसेच उपस्थित अन्य सरपंचांनीही श्री. परब यांचे अभिनंदन केले. यावेळी साटेली -भेडशी सरपंच लखू खरवत, झोळंबे सरपंच राजेश गवस, तळकट सरपंच महादेव धुरी, सासोली सरपंच दिपाली धाऊस्कर, वझरे सरपंच लक्ष्मण गवस, विर्डी सरपंच उत्कर्षा माजिक, आयी सरपंच साजू नाईक, कळणे सरपंच प्रिया नाईक तसेच सावंतवाडी तालुक्यातील नाणोस सरपंच वासुदेव जोशी, वेर्ले सरपंच सुरेश राऊळ आदी उपस्थित होते.