जम्मू / वृत्तसंस्था
‘द रेसिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना शनिवारी जम्मू पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. काझिगुंड-चुरथ येथील रईस अहमद आणि कुलगाम-अश्मुजी येथील सुबझर अहमद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एका कारमधून श्रीनगरच्या दिशेने जात असताना नारवाल बायपास येथे दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या ‘एसओजी’ पथकाने ही कारवाई केली. संशयित दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये रायफल, मॅगझीन्स, पिस्तूल अशा घातक साहित्याचा समावेश आहे. संबंधितांवर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास हाती घेण्यात आला आहे.