अरगन तलावात उडी टाकून संपविले जीवन
प्रतिनिधी /बेळगाव
आपल्या दोन मुलांसह आईने तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. अरगन तलावात या महिलेने आपल्या मुलांसह जीवन संपविले असून रात्रीपर्यंत दोन मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही.
क्रिशा मनीष केशवाणी (वय 36), मुलगा भाविर (वय 4), विरेन (वय 7, सर्व रा. सह्याद्रीनगर) अशी त्यांची नावे आहेत. क्रिशा व भाविरचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशमन दल व एसडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. आणखी एका मृतदेहासाठी रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. अंधारामुळे ही मोहीम थांबविण्यात आली असून शनिवारी सकाळी पुन्हा ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
क्रिशाचे माहेर मिरज (जि. सांगली) येथे आहे. तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते कराडला गेले आहेत. तिचे माहेरवासीय बेळगावला निघाले असून ते आल्यानंतरच या विषयी अधिक माहिती मिळणार आहे. त्यानंतरच एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाचे अधिकारी शशिधर निलगार व व्ही. एस. टक्केकर हे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिशा आपल्या दोन मुलांना शाळेला सोडण्यासाठी दुचाकीवरुन शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता घरातून बाहेर पडल्या. हिंडलगा, गणेश मंदिरापाठिमागील मेडप्लस या औषध दुकानाजवळ आपली दुचाकी उभी करुन दोन्ही मुलांसह या महिलेने अरगन तलाव परिसरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
दुपारी तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला. त्यामुळे शोध मोहीम हाती घेण्यात आली. क्रिशा व भाविर या दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत. विरेनसाठी शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक माहिती मिळविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. माहेरवासीय बेळगावात दाखल झाल्यानंतरच या घटनेचे निश्चित कारण समजू शकणार आहे.