गोव्यातील अनेक चोऱयांचा छडा लागण्याची शक्यता
प्रतिनिधी /मडगाव
उच्च शिक्षण घेतलेल्या आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यात चोऱया करुन त्या त्या राज्यातील पोलिसांची झोप उडविणाऱया दोन सदस्यीय चोरटय़ांच्या एका टोळीला मायणा -कुडतरी पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले. अनेक चोऱयात गुंतलेले असल्याची कबुली या टोळीने दिली आहे. आंध्र पोलिसांनी या टोळीकडून सुमारे 44 लाखांचा चोरीचा ऐवज यापूर्वीच जप्त केलेला आहे.
आंध्र प्रदेशातील 29 वर्षीय व्यंकटेशश्वर रेड्डी आणि हैदराबाद येथील 35 वर्षीय व्यंकट विनय नदीमपल्ली (35) अशी अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावे आहेत.
राळोय -कुडतरी येथील सुरज नाईक यांच्या घरात गेल्या काही दिवसापूर्वी चोरी झाली होती. रोख, सोन्याचे दागिने, विद्यूत उपकरणे मिळून 1,79,000 रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला होता. या चोरीप्रकरणी मायणा -कुडतरी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता आणि या चोरीप्रकरणाचा तपास चालू होता.
पोलीस तपासात तपास यंत्रणेचा संशय वरील दोघांवर बळावला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. या चोरटय़ांकडून 4 ते 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यातील जवळ -जवळ 90 टक्के ऐवज पर्वरी येथे केलेल्या एका चोरीप्रकरणातील असल्याची माहिती या चोरटय़ांनी मायणा – कुडतरी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकेश हडफडकर, उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक, उपनिरीक्षक महेश वेळीप, उपनिरीक्षक दीपेश शेटकर, उपनिरीक्षक प्रशांत भगत, उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप, उपनिरीक्षक करिश्मा प्रभू, साहा. उप निरीक्षक उदय वेळीप, हवालदार चंद्रकांत वेळीप, पोलीस शिपाई रिझवान शेख, धिरज नाईक, सन्नी देसाई, दिप्तेश नाईक यांच्या पथकाने ही तडफदार कारवाई केली.