पहिल्या टप्प्यात खड्डे बुजविणे, धोकादायक वळणे कापण्याचे काम
प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार मार्गावरील धर्मापूर ते गुळेपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यापुढे देखील काणकोण मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्तपणे लढा देतील. हे दोन्ही पक्ष केवळ निवडणुकीपुरतेच एकत्र आले नव्हते. यापुढे देखील ते एकत्र राहतील, असे गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे. या कामाची सुरुवात गुळे येथून करण्यात आली आहे.
धर्मापूर ते गुळेपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अशी अवस्था झालेली असून या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाची जबाबदारी स्वीकारलेल्या ठेकेदाराने 1 मार्चपासून कामाला सुरुवात केली नाही, तर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा स्पष्ट इशारा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने मडगावातील हायवे विभागाचे अधीक्षक अभियंता कामत यांना निवेदन देऊन दिला होता. त्यानुसार 1 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याबद्दल काँग्रेसचे जनार्दन भंडारी आणि प्रशांत नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हायवे विभागाचे अभिनंदन केले आहे.
पहिल्या टप्प्यात सदर रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याचे त्याचबरोबर धोकादायक वळणे कापून रस्ता निर्धोक करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱया टप्प्यात हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाची वर्क ऑर्डर ऑक्टोबर, 2021 मध्ये देण्यात आली होती. या रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल श्रीस्थळचे सरपंच रामू नाईक, माजी सरपंच गणेश गावकर, आगोंदचे पंच आबेल बोर्जिस यांनीही यावेळी खात्याचे अभिनंदन केले.