वखार महामंडळाच्या गोदामासमोर ट्रक असतात उभे
नजीकच्या रस्त्यावर उभे करण्याची मागणी
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ-एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावर वखार महामंडळाच्या गोदामासमोर उभ्या करून ठेवण्यात येणाऱया धान्य वाहतुकीच्या ट्रकमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धान्य उतरवून झाल्यानंतरही ट्रक मुख्य रस्त्यावर बेजबाबदारपणे उभे करून ठेवले जात आहेत. एमआयडीसीसह वखार महामंडळ व जिल्हा पुरवठा विभागाने याची दखल घेऊन हे ट्रक धान्य चढउतार केल्यानंतर नजीकच्या रस्त्यावर उभे करावेत. जेणेकरून अन्य वाहनांना त्रास होणार नाही.
वखार महामंडळाचे गोदाम एमआयडीसीमध्ये असून रेल्वेने जिल्हय़ातील रास्त दुकानांचे धान्य आल्यावर ते गोदामामध्ये उतरवून ठेवले जाते. धान्याची वाहतूक करण्यासाठी संस्थेला ठेका दिलेला आहे. धान्य वाहतूक केल्यानंतर हे ट्रक गोदामासमोरच रस्त्यावर उभे करून ठेवण्यात येतात. या रस्त्यावरुन परुळे, मालवण, म्हापण, निवती दशक्रोशीत मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होते. ट्रक रस्त्यावर उभे केले, तर समोरुन येणाऱया वाहनामुळे दोन वाहने सुटू शकत नाहीत. दुचाकी चालकांना तर हा मोठा धोका असून हे ट्रक तेथे लगत असलेल्या लहान साईड रोडवर उभे करावेत व मुख्य रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
आता हा रस्ता डांबरीकरण झाला असून अन्य वाहनेही वेगाने धावतात. त्यामुळे उभे असलेले ट्रक व वाळू वाहतुकीसाठी जाणाऱया डंपरच्यामध्ये समोरुन येणारे दुचाकीस्वार सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.
काहीवेळा ट्रक रस्त्याच्या दुतर्फा लावलेले असतात. वळणावर ट्रक लावले जात असल्याने समोरुन येणारी वाहनेही दिसत नाहीत. या सर्व धोक्यांचा विचार करून एमआयडीसीने मुख्य रस्त्यावरील ट्रक हटवावेत, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.