प्रतिनिधी / फोंडा
पेटके धारबांदोडा येथे मिनी टेंपोने स्कूटरला पाठिमागून धडक दिल्याने त्यात मकबुल बादशाह दस्तगिरी तांबोटी (64) या स्कूटरचालकाचा मृत्यू झाला. काल मंगळवारी सकाळी 9.30 वा. सुमारास फोंडा-बेळगाव महामार्गावर पेटके धारबांदोडा येथे हा अपघात झाला. मयत मकबुल हा गेल्या काही वर्षांपासून भूमिकानगर धारबांदोडा येथे वास्तव्यास होता. हल्लीच त्याने आपले बिऱहाड धारबांदोडय़ातील जुन्या वाहतूक कार्यालयाजवळ हलविले होते. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मकबुल हा जीए 09 एफ 8768 या ऍक्टिवा स्कूटरवरुन धारबांदोडय़ाहून तिस्क उसगावच्या दिशेने येत होता. यावेळी पाठिमागून येणाऱया जीए 06 टी 1731 या क्रमांकाच्या मिनी टेंपोने त्याच्या स्कूटरला धडक दिली. स्कूटरसह रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या मकबुल याला उपचारासाठी तिस्क पिळये येथील आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी टेंपोचालक राहूल दामोदर गोसावी (24, रा. सावर्डे) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन हाकून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक सूरज काणकोणकर हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. मयत मकबुल हा छोटीमोठी कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा असे त्याला ओळखणाऱया स्थानिकांनी सांगितले.