ऑनलाईन टीम / लंडन :
आठ वेळा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा
जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट याला कोरोनाची बाधा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोल्टने नुकताच आपला 34 वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला कोरोना ची लागण झाली असल्याचे सिद्ध झाले आहे.
बोल्टने वाढदिवसानिमित्त केलेल्या जंगी पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील सहभागी झाला होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती.
- अजून रिपोर्ट मिळालेले नाहीत : बोल्ट
दरम्यान, सध्या बोल्ट स्वयं-विलगीकरणात आहे. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बोल्टने एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, मीडियाच्या माहितीनुसार, मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी शनिवारी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यामुळे मी माझी जबाबदारी समजून घरी विलागिकरणात आहे.
सध्या माझ्यामध्ये कोणतेही लक्षण नाही. तसेच अजून माझे कोरोनाचे रिपोर्ट मिळालेले नाहीत ते काय येतात याची मी देखील वाट पाहत आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी सुरक्षित आणि स्वस्थ रहा.