प्रतिनिधी / मडगाव
राज्यात सद्या कोरोनाने थैमान घातले आहे. आगामी काळात रूग्णांच्या सख्येत आणखी भर पडण्याची शक्यता असल्याने, सरकारने कोरोनासाठी तीन हॉस्पिटल्स कार्यरत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मडगाव कोविड हॉस्पिटलच्या धर्तीवर फोंडय़ात व बांबोळीत ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सद्या ही तिन्ही हॉस्पिटल्स कोरोना बाधित रूग्णांना हाताळत आहेत.
गोमेकॉचे वॉर्ड क्रमाक 145, 146, व 147 हे कोरोनाची बाधा झालेले परंतु अन्य आजारांची पार्श्वभूमी (कोमोरबिड) असलेल्या रूग्णांसाठी वापरात आणले जाणार आहे. वास्तविक काल सोमवारपासून हे वॉर्ड सुरू केले जाणार होते व तशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली होती. परंतु, कालपासून हे वॉर्ड प्रत्यक्षात सुरू झालेले नाहीत. या वॉर्डात दाखल केल्या जाणाऱया रूग्णांसाठी गोमेकॉतील अन्य आजारांवरील उपचार पद्धती वापरात आणली जाणार आहे.
आयडी हॉस्पिटलचाही होणार वापर
फोंडय़ातील आयडी हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून वापर सुरू झाला आहे. सद्या या ठिकाणी कोरोना संक्रमित गरोदर महिलांना तसेच लहान बाळांना दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांना मडगावच्या जुन्या हॉस्पिसियो हॉस्पिटलात स्थलांतरीत केले जाणार आहे आणि सद्या हॉस्पिसियोत उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांना तसेच शस्त्रक्रिया विभाग मडगावच्या नव्या जिल्हा हॉस्पिटलात स्थलांतरीत केला जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर जुने हॉस्पिसियो हे केवळ कोरोना संक्रमित गरोदर महिलांसाठी तसेच लहान बाळांसाठी वापरात आणले जाणार आहे.
फोंडा आयडी हॉस्पिटलात सद्या दाखल करण्यात आलेल्या गरोदर महिलांना तसेच लहान बाळांना पुन्हा मडगावात आणले गेल्यानंतर आयडी हॉस्पिटल पूर्णपणे कोविड हॉस्पिटल म्हणून वापरात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोविड हॉस्पिटल मडगाव, गोमेकॉचे तीन वॉर्ड तसेच फोंडा आयडी हॉस्पिटल अशी तीन हॉस्पिटलनंतर केवळ कोरोना बाधित (सिम्प्टोमॅटिक) रूग्णांसाठी वापरात आणली जाणार आहे. सद्या मडगावच्या कोविड हॉस्पिटलवर प्रचंड ताण असून या ठिकाणी 206 कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. या हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग सतत रूग्णांनी भरलेला असतो. काल आयसीयू आणि आयटीयूमध्ये एकूण 22 रूग्णांना दाखल केलेले आहेत.