महेंद्रसिंग धोनीने देशातील सर्व यष्टीरक्षकांना नवी दिशा दाखवली आहे. कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांच्यासारख्या फिरकी गोलंदाजांकडून त्याने उत्तम कामगिरी करवून घेतली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय यष्टीरक्षकाकडून नेहमीच सर्वांना अधिक अपेक्षा असतात. यास अनुसरुन एका प्रश्नाला उत्तर देताना धोनीची जागा भरुन काढणे कोणालाही शक्य नसल्याचे केएल राहुलने सांगितले.
‘महेंद्रसिंग धोनीची जागा भरुन काढणे कोणालाही शक्य होणार नाही. यष्टीरक्षक व फलंदाज अशा दुहेरी जबाबदाऱया कशा रितीने यशस्वीरित्या सांभाळता येऊ शकतात, हे धोनीने दाखवून दिले आहे. कुलदीप, यजुवेंद्र, रविंद्र जडेजा यांच्याशी माझा उत्तम स्नेह आहे आणि जेथे-जेथे शक्य आहे, तेथे मी त्यांना मला जे वाटते ते निश्चितपणे सांगेन. आयपीएल स्पर्धेत यष्टीरक्षणाबरोबरच मी नेतृत्वही सांभाळले. त्या अनुभवाचा मला निश्चितच लाभ होईल’, असे केएल राहुल तपशीलवार बोलताना म्हणाला.