नंदगड / वार्ताहर
नंदगड गावच्या पश्चिमेला 5 किलोमीटर अंतरावर आनंदगड किल्ल्यावर असलेल्या स्वयंभू दुर्गा देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी देवीचा दिवस असल्याने भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर व किल्ला परिसरात जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.
नंदगड-आनंदगड किल्ल्यावरील दुर्गा देवी मंदिरात नवरात्र उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे घटस्थापनेपासून रोज शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. नवरात्र उत्सव कमिटीच्यावतीने रोज देवीची विविध अवतारात पूजा केली जात आहे. आरती, अभिषेक, होम व महाप्रसादाचे आयोजनही केले जात आहे. देवीच्या दर्शनाबरोबरच आनंदगड किल्ल्यावरील अवशेष पाहण्यात भाविक व नागरिक मग्न होत आहेत. तेथील निसर्ग सौंदर्य घनदाट झाडी व ऐतिहासिक पुरावे यामुळे भक्ती बरोबरच इतिहासात रमण्याचा अनुभव सर्वाना येत आहे. त्यामुळे एक दिवसाची सहल असल्याचे सर्वाना वाटत आहे. आनंदगड किल्ल्यावर जाण्यासाठी नंदगड गावापासून व सावरगाळी गावापासून असे दोन रस्ते आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर काही प्रमाणात चिखल झाला होता. परंतु देवीच्या श्रद्धेपोटी भाविक आपल्या दुचाकीवरून तर काहीजण ट्रक्टरमधून तर काही भाविक चालत जात होते. शुक्रवारी 20 हून अधिक ट्रक्टर किल्ला परिसरापर्यंत गेले होते. आमदार अंजली निंबाळकर यांनी शुक्रवारी स्वयंभू दुर्गा देवीचे दर्शन घेतले.