बहुप्रतीक्षित अशी ’नक्सलबारी‘ ही वेबसिरीज ओटीटी माध्यमावर नुकतीच प्रदर्शित झाली आणि तिला सर्वच थरातून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीसुद्धा या वेब सिरीजला डोक्यावर घेतले असून अभिनय ते दिग्दर्शन आणि पटकथा ते सादरीकरण या सर्वच अंगांच्या बाबतीत या मालिकेवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
नक्षलबारी ही झी5वर नुकतीच प्रदर्शित झाली असून ती जीसिम्सची पहिली निर्मिती आहे. ही वेब सिरीज निर्मितीच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. कोविड 19 साथरोगाच्या टाळेबंदीमधून थोडीशी सूट सरकारने दिल्यानंतर लगेचच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. संपूर्ण मनोरंजन विश्वाने लॉकडाऊनमुळे कामावर स्थगिती दिली असताना अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतफत्वाखालील जीसिम्सने चित्रीकरणाला सुरुवात करायचे ठरवले. ठरल्या वेळेत मालिका प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण गोवा येथे एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. नक्षलबारीच्या निर्मात्यांनी हिंदी कॉन्टेन्ट निर्मितीमध्ये प्रवेश करून मनोरंजन क्षेत्राची त्याबाबतीतही वाहवा मिळवली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातले निर्माते आणि अभिनेते हिंदी वेब सिरीजच्या क्षेत्रात कशाप्रकारे मुसंडी मारतात, ते सिद्ध करत त्यासाठीही ते कौतुकपात्र ठरले आहेत. नक्षलबारीचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक पार्थो मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल हे मुख्य भूमिकेत आहेत. टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा हे इतर आघाडीचे कलाकारसुद्धा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पार्थो मित्रा हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल उद्योगक्षेत्रातील दर्जेदार दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे आघाडीचे नाव आहे. बडे अच्छे लगते है, कसम से आणि इतना करो ना मुझे प्यार यांसारख्या लोकप्रिय भारतीय सोप ऑपेरा त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी कोई आप सा या हिंदी चित्रपटाचे आणि हम या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.