ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज देशातील 10 नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत. दिल्लीच्या विज्ञान भवनात होणाऱया या उच्चस्तरीय बैठकीला संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत गृहमंत्री शाह नक्षलवादाच्या समस्येने प्रभावित झालेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवायांचाही ते आढावा घेतील.
या बैठकीत नक्षलग्रस्त भागात रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंदे बांधण्यासारख्या विकास कामांचाही शाह आढावा घेऊ शकतात. तसेच नक्षलग्रस्त राज्यांना केंद्रीय मदत देऊन पुढील रणनीती आखली जाऊ शकते.
दरम्यान, गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी झाला आहे. मात्र, देशात एकूण 90 जिल्हे नक्षलवादाने प्रभावित मानले जातात. हे जिल्हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा संबंधित खर्च योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 61 जिह्यांमध्ये नक्षलवादी हिंसाचाराची नोंद झाली आणि 2020 मध्ये ही संख्या 45 पर्यंत कमी करण्यात आली. 2015 ते 2020 या काळात नक्षलग्रस्त भागात झालेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सुमारे 380 सुरक्षा कर्मचारी, 1000 नागरिक आणि 900 नक्षलवादी ठार झाले होते. याच काळात एकूण 4200 नक्षलवाद्यांनीही शरणागती पत्करली होती.