प्रतिनिधी / पणजी
नगरपालिकांमधील प्रभाग फेररचनेतील घोळ आता चव्हाटय़ावर आला आहे. या फेररचनेला आव्हान देणाऱया पाच याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर झाल्या आहेत. या याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे.
डिचोली, कुडचडे, मडगाव, काणकोण, केपे आणि कुंकळ्ळी पालिकेतील प्रभाग फेररचना अत्यंत चुकीची असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या पालिकांमधील प्रभागांची संख्या वाढवताना प्रभाग फेररचना झाली. त्यात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुरगाव पालिका क्षेत्रातील मुरगाव मतदारसंघात महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. यावर आता खंडपीठात चर्चा होणार आहे. काणकोण पालिकेत तर कहरच झाला असून 10 ऐवजी आता 12 प्रभाग करण्यात आले आहेत. पैकी 4 प्रभाग महिलांसाठी राखीव तीन प्रभाग इतर मागास वर्गीयांसाठी राखीव ठेवून सामान्यांसाठी अडथळा निर्माण झाल्याचा प्रश्न मांडण्यात आला आहे.