प्रतिनिधी / पणजी
मगोच्या दोन आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका सादर करणारे मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे की जो निर्णय एक वर्षापूर्वी होणे आवश्यक हाते ते आता होत आहे. सभापतींनी योग्य दखल घ्यावी आणि योग्य निर्णय घ्यावा. कायद्यात नमूद केले आहे तसेच करावे व निवाडा द्यावा. या निवाडय़ाने उद्या दुसरे कोणतेही राजकीय पक्षातील आमदार फुटणार नाहीत व कायद्यानुसार पक्षांतर करणाऱयांना पुढील निवडणुकीवर सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी, असे सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले. आपण न्यायालयासाठी लढतोय. आमचाच विजय होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निणर्याचे स्वागतः सरदेसाई
‘न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणे’ अशी एक म्हण आहे. त्या दृष्टीने 12 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सभापतींना दिलेले निर्देश उशिराने जरी आले असले तरी आता सभापतींना या प्रकरणी निवाडा करावाच लागेल. त्यामुळेच आपण या निर्णयाचे स्वागत करतो, असे माजी उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
घटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार गोव्यात अत्याचार होतोय. गोमंतकीय जनता सुशिक्षित आणि ससंस्कृत असून देखील आयाराम गयाराम करणाऱया आमदारांना निवडून दिले जातेच. याबाबत देश आम्हाला सर्वांनाच प्रश्न करेल. गोमंतकाचे नाव राजकीय नेत्यांची या आयाराम गयाराम प्रवृत्तीने खराब केले आहे. यावर उत्तम कायम स्वरूपी उतारा म्हणजे सभापती राजेश पाटणेकर यांनी यावर कडक निर्णय
दि. 26 फेब्रुवारीपर्यंत घ्यावा आणि स्वतःचे व सभापतींचे नाव गोमंतकाच्या इतिहासात राखावे, असे विजय सरदेसाई म्हणाले. यापुढे कोणत्याही आमदाराला पक्षांतर करण्याचे धाडस होणार नाही. असाच निवाडा सभापती राजेश पाटणेकर यांनी द्यावा, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.