वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथील कलिंगा स्टेडियममधील नवल टाटा हॉकी अकादमीला भारताचे माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, लेन अय्यप्पा आणि दिलीप तिर्की यांनी भेट देऊन येथील सुविधांची पाहणी केली.
ओडिशा राज्यातील कलिंगा स्टेडियमवर ही हॉकी अकादमी स्थापन करण्यात आली असून या अकादमीमध्ये देशातील नवोदित पुरुष आणि महिला हॉकीपटूंना दर्जेदार प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या आधुनिक हॉकी क्षेत्रातील अनुभव या नवोदित हॉकीपटूंना मिळण्याची व्यवस्था या अकादमीतर्फे केली जात आहे. भारताच्या या माजी हॉकीपटूंनी सध्या येथे प्रशिक्षण घेत असलेल्या पुरुष आणि महिला हॉकीपटूंशी संवाद साधला. हॉकी क्षेत्रामध्ये भारताचा दर्जा पुन्हा सुधारण्यासाठी ओडिशा शासन आणि टाटा उद्योग समूहातर्फे कलिंगा स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करत हॉकी अकादमीची स्थापना केली आहे. याचा लाभ देशातील नवोदित हॉकीपटूंना मोठय़ा प्रमाणात मिळत असल्याचे भारताच्या या माजी हॉकीपटूंनी सांगितले. 2018 साली विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद ओडिशाने भूषविले होते. ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यात ओडिशा शासनाचा वाटा महत्त्वाचा असल्याचे भारताच्या माजी हॉकीपटूंनी सांगितले.