सरत्या वर्षाला निरोप : शहर व ग्रामीण भागात विविध उपक्रम
वार्ताहर/ निपाणी
गेल्या वर्षभरातील वाईट आठवणींचे विसर्जन करताना चांगल्या आठवणी मनात भरून ठेवताना उजाळा देत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. त्याचबरोबर नववर्षाचे जल्लोषात उत्साही ‘सु’स्वागत करण्यात आले. यासाठी अनेकांनी मंगळवारची रात्र जागून काढताना एकच जल्लोष केला. यामुळे सर्वत्र आनंदाला बहर आल्याचे दिसून आले.
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरु होती. व्यावसायिकांनीही या संधीचा फायदा उठवत प्रती दीपावली नफा मिळविण्याचे नियोजन केले होते. या सर्व लगबगीमुळे सोमवारी सायंकाळपासून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. किराणा दुकानापासून ते हॉटेल-धाब्यापर्यंत व आईस्क्रिम पार्लरपासून बार-वाईनशॉपपर्यंत सर्वत्रच गर्दी दिसत होती. अनेक व्यावसायिक अस्थापनांना आकर्षक विद्युत रोषणाई करून ग्राहकांना मोहित करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व उलाढालीतून अनेकांना रोजगार मिळालाच. पण त्याचबरोबर लाखोंची उलाढाल शहर व ग्रामीण भागात झाली.
वर्षभरात झालेल्या चुका, वाद यांचे विसर्जन केले. नववर्षाचे स्वागत करत नवनवे संकल्पही केले. हे संकल्प पूर्ण करण्याच्या मनामनात, मित्र परिवाराच्या साक्षीने शपथा घेतल्या गेल्या. संकल्प पूर्ण करण्याचा दावा करताना अनेकांनी तर पैजा लावल्या. यामध्ये रोख रकमेसह मुंडण करण्यापर्यंतच्या पैजांचा समावेश आहे. हा उत्सव म्हणून साजरा करत पाटर्य़ा, मेजवान्यांचे आयोजन केले होतच. पण त्याचबरोबर घराघरात शाकाहारी, मांसाहारी जेवणावळीचे आयोजन केले होते. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी ठिकठिकाणी करण्यात आली.
नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूर्वी भेटकार्ड, भेटवस्तू दिल्या जायच्या. पण सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रगतीत हे सर्व मागे पडले. सोशल मीडियाचा वापर करत अगदी सोप्या पद्धतीने पण आकर्षक संदेशांनी शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलचे रकाने शुभेच्छा संदेशांनी भरून गेले होते.
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना सर्वत्र जल्लोष ओसंडून वाहतो. पण हा जल्लोष होत असताना कोठेही गालबोट लागू नये यासाठी सीपीआय संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, ग्रामीण व बसवेश्वर चौक पोलीस स्थानकांतर्फे निपाणी तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
महागाई कमी होऊ दे….
सन 2019 या सरत्या वर्षात सामान्य व कष्टकऱयांना महागाईच्या आगडोंबाने अक्षरशः होरपळून काढले. नववर्षात पुन्हा हेच दुखणे नको, असे म्हणत अनेकांनी नववर्षाचे स्वागत करताना नव्या वर्षात तरी महागाई कमी होऊ दे, अशी प्रार्थना केली.