उद्यापासून 5 जानेवारीपर्यंत महोत्सवाचे आयोजन : सिने-नाटय़ कलाकारांची मांदियाळी
वार्ताहर / कणकवली:
कणकवली न. पं. आयोजित पर्यटन महोत्सव 2020 ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महोत्सवासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात भव्य व्यासपिठाची उभारणी करण्यात आली आहे. 2 जानेवारी रोजी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन होणार असून 5 जानेवारीपर्यंत मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध असणार आहे. राज्यस्तरीय कलाकारांची मांदियाळी या निमित्त कणकवलीत असणार आहे. आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून व नगराध्यक्ष समीर नलावडे व सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्त मनोरंजनासोबतच फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून कोकणातील खाद्य संस्कृती अनुभवता येणार आहे. कणकवलीसह जिल्हय़ातील सुमारे 200 स्थानिक कलाकारांचा ‘सुवर्ण तडका’ हा कार्यक्रमही होत आहे. कणकवलीतील लहान मुलांचा फॅशन शो या महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
येथील भाजप कार्यालयासमोरील पटांगणात हा महोत्सव करत असताना या पटांगणात खाद्य पदार्थांसह अन्य स्टेशनरी व कॉस्मेटिक वस्तुंचे स्टॉल असणार आहेत. मत्स्य खवय्यांसाठी वर्सोवा येथील कोळी बांधवांचे हॉटेलही खास मुंबईहून पर्यटन महोत्सवासाठी येणार आहे. महोत्सवासाठी येणाऱया नागरिकांची वाहने पार्किंगसाठी न. पं.मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नरडवे रोडवर राजन तेलींच्या निवासस्थानाच्या बाजूला मोकळ्य़ा जागेत व नाथ पै नगर येथील जागेत वाहने पार्किंग करता येणार आहेत. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक व शहरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी नियोजन करत असून हा महोत्सव कणकवलीकरांचा असून यात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.