नवदुर्गा मंडळाचा पुढाकार : 25 कुटुंबियांना तहसीलदारांच्या हस्ते वाटप
वार्ताहर / फोंडाघाट:
नवीन कुर्ली वसाहत येथील गरजू 25 कुटुंबांना फोंडाघाट येथील उद्योजक संजय आग्रे व आबा सामंत यांच्या सहकार्यातून तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जीवनाश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, डाळ, गोडेतेल, कांदे बटाटे, मसाला आणि बिस्कीट पुडय़ांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. हातावर पोट असलेल्यांच्या चुली पेटविणे कठिण झाले आहे. अशांसाठी मदत करण्याची मागणी नवीन कुर्ली-फोंडाघाट येथील नवदुर्गा युवा मंडळाने केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, फोंडाघाट मंडळ अधिकारी दिलीप पाटील यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केले होते. त्यानुसार या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नवदुर्गा मंडळाच्या या कार्याबद्दल सर्वांनीच कौतूक केले.
फोंडाघाट मंडळ अधिकारी दिलीप पाटील, उद्योजक संजय आग्रे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, सचिव अविनाश चव्हाण, ग्रामस्थ राजेंद्र कोलते, रवींद्र नवाळे, उपाध्यक्ष दीपक शिंदे, सल्लागार अरुणोदय पिळणकर, मंगेश मडवी, अमित दळवी, विजय आग्रे, सचिन परब, अनिल दळवी, सचिन साळसकर, समीर राणे आदी उपस्थित होते.