प्रतिनिधी/ सांगली
महापौर सौ. संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर, उपमहापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन महापौर व उपमहापौर निवडीचा प्रस्ताव आज प्रशासनाकडून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, फेबुवारीच्या पहिल्या आठवडय़ात महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांना अजून 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपाने महापालिकेत कमळ फुलविले. दरम्यान, भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मिरजेच्या सौ. संगीता खोत यांना मिळाला. तर धीरज सूर्यवंशी यांना उपमहापौर करण्यात आले होते. दोघांनाही सव्वावर्षासाठी पदे देण्यात आली होती. तरीही दीड वर्षे त्यांनी पद भूषविले. मुदत संपल्याने इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पदाधिकारी बदलाबाबत आग्रह धरला होता. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्याने चंद्रकांतदादा यांनी महापौर, उपमहापौर बदलाबाबत सबुरीचा सल्ला दिला होता.
मात्र शनिवारी त्यांनीच महापौर सौ. खोत व उपमहापौर सूर्यवंशी यांना फोन करुन राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघांनीही सोमवारी झालेल्या महासभेत राजीनामा दिला. दरम्यान खोत व सूर्यवंशी यांच्या राजीनाम्यानंतर नवीन महापौर व उपमहापौर निवडीच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खोत यांनी आयुक्तांच्याकडे तर सूर्यवंशी यांनी खोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. दोघांचेही राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. नवीन महापौर, उपमहापौर निवडीसाठी प्रशासनाकडून आज विभागीय आयुक्तांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार फेबुवारीच्या पहिल्या आठवडय़ात नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.