पहिल्या सामन्यातील अपयशाची भरपाई करण्याचा प्रयत्न, अष्टपैलू मोईन अली दाखल झाल्याने चेन्नईची लाईनअप आणखी भक्कम
मुंबई / वृत्तसंस्था
आपल्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेले चेन्नई सुपरकिंग्स व लखनौ सुपरजायंट्स संघ आज (गुरुवार दि. 31) आयपीएलमधील दुसऱया साखळी सामन्यात आमनेसामने भिडत असून नव्याने सुरुवात करण्यावर दोन्ही संघांचा भर असणार आहे. अष्टपैलू मोईन अली चेन्नई संघात दाखल झाला असून येथील लढतीसाठी तो उपलब्ध असल्याने ही बाब त्यांच्या पथ्यावर पडू शकेल. या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
चेन्नई सुपरकिंग्स व लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघांना पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला, त्यावेळी त्यांचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले होते आणि आजच्या लढतीत त्या अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दोन्ही संघांना प्रयत्नशील रहावे लागेल.
दोन महिने चालणाऱया आयपीएल स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली असली तरी प्रत्येक सामन्यात नाणेफेकीचा कौल विशेष महत्त्वाचा ठरत असल्याचे एव्हाना अधोरेखित झाले आहे. दुसऱया डावादरम्यान डय़ू फॅक्टरमुळे नाणेफेक जिंकणारे संघ आपल्या प्रतिस्पर्ध्यांना प्रथम फलंदाजीला पाचारण करण्यावर भर देत आले आहेत.
चेन्नई व लखनौ या दोन्ही संघांना यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करत असतानाच पराभवाचा सामना करावा लागला होता. आता येथील मैदानावर देखील फारशी वेगळी स्थिती नसेल, असे संकेत असून दुसऱया डावादरम्यान डय़ू फॅक्टर येथेही निर्णायक ठरु शकतो. लखनौचा कर्णधार केएल राहुल व सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक यांनी पहिल्या लढतीत सपशेल निराशा केली आणि येथे त्यांच्याकडून त्या अपयशाची भरपाई अपेक्षित असेल. विशेषतः नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी लाभलेल्या केएल राहुलला पुढाकाराने लढावे लागणार आहे.
अनुभवी मनीष पांडे व इव्हिन लुईस हे हार्डहिटर फलंदाज कोणत्याही गोलंदाजांचा धुव्वा उडवण्यासाठी सक्षम ठरत आले असून त्यांच्यासमोर देखील मागील अपयशाची भरपाई करण्याचे लक्ष्य असेल. लखनौ संघाच्या मध्यफळीची जबाबदारी दीपक हुडा, पदार्पणवीर आयुष बदोनी, कृणाल पंडय़ा यांच्यावर असून आघाडी लाईनअप कोसळली तर अर्थातच या त्रिकुटावरच सर्व भिस्त असणार आहे.
लखनौला गोलंदाजीच्या आघाडीवर देखील बरीच चिंता आहे. गुजरातच्या फलंदाजांनी या सर्वांचा उत्तम समाचार घेतला होता, हे विसरुन चालणार नाही. दुष्मंता चमीरा, अवेश खान यांना काटेकोर मारा करावा लागेल. शिवाय, रवि बिश्नोई, हुडा, कृणाल यांच्या फिरकी गोलंदाजीवर देखील संघाची बरीच भिस्त असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः रविंद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, दीपक चहर, अम्बाती रायुडू, रॉबिन उत्थप्पा, मिशेल सॅन्टनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी. हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के. भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरनजीत सिंग, मुकेश चौधरी.
लखनौ सुपरजायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवी बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्ड्रय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
चेन्नईला फलंदाजीच्या आघाडीवर अधिक चिंता
यापूर्वी पहिल्या सामन्यात अवघ्या 131 धावांवर समाधान मानावे लागलेल्या चेन्नईला येथेही फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. पिंच हिटर मोईन अली संघात दाखल झाल्याने ही मात्र त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे.
यापूर्वी, सलामी लढतीत महेंद्रसिंग धोनीने आपला ‘व्हिन्टेज गेम’ दाखवून दिल्याने चेन्नईचे चाहते अर्थातच सुखावले होते. आता तोच धडाका धोनीसह त्याच्या अन्य सहकाऱयांनी देखील गाजवावा, ही चेन्नईयन्सची अपेक्षा असणार आहे. ऋतुराज गायकवाड, रॉबिन उत्थप्पा, डेव्हॉन कॉनवे किंवा अम्बाती रायुडूसारख्या फलंदाजांकडून चेन्नईला भरीव अपेक्षा असतील.
कर्णधार रविंद्र जडेजा स्वतः धावांची आतषबाजी करण्यासाठी उत्सुक असेल. शिवाय, शिवम दुबेकडून देखील हीच अपेक्षा असणार आहे. मात्र, मोईन अलीला तिसऱया स्थानी खेळवायचे असेल तर यातील एक खेळाडू बाहेर ठेवावा लागेल, हे निश्चित आहे. यापूर्वी केकेआरविरुद्ध सलामी लढतीत चेन्नईकडून रॉबिन उत्थप्पा तिसऱया स्थानी उतरला होता. त्यावेळी त्याने 21 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले होते. अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्होने केकेआरविरुद्ध 3 बळी घेतले. त्या तुलनेत अन्य सहकारी गोलंदाज मात्र महागडे ठरले होते.