मॉडेल मडगावच्या मनोज मसूरकर यांचा कार्ले-पेड भागात प्रचार, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा सहभाग
प्रतिनिधी / मडगाव
पालिका निवडणूक आरक्षणविषयक नवीन अधिसूचनेमुळे मडगावातील सुमारे 14 प्रभागांतील उमेदवारांना फटका बसला असला, तरी उर्वरित 11 प्रभागांतील उमेदवारांना त्याची झळ बसत नसल्याने त्यातील काहींनी आपला प्रचार चालू ठेवल्याचे दिसून येत आहे. प्रभाग 15 तील काँग्रेसप्रणित मॉडेल मडगाव पॅनलचे उमेदवार मनोज मसूरकर यांनी रविवारी कार्ले-पेड भागात आमदार दिगंबर कामत यांच्यासह घरोघरी भेटी देऊन प्रचार केला.
विरोधी पक्षनेते असलेले स्थानिक आमदार कामत यांनी मसूरकर हे कार्यक्षम नगरसेवक असल्याचे सांगताना त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन कार्ले-पेड भागातील मतदारांना केले. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा त्यांच्यासोबत होता. कालकोंडा परिसरातील प्रभाग 16 चे मावळते नगरसेवक असलेले मसूरकर पूर्वीचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने प्रभाग 15 मधून यंदाची निवडणूक लढवत आहेत. आपण प्रभाग 16 मध्ये भरघोस विकासकामे करताना लोकांना सामाजिक योजनांचा लाभ मिळवून दिला. अशाच प्रकारे आपण प्रभाग 15 चा विकास करणार व आवश्यक सरकारी योजना तसेच सुविधांचा लाभ येथील रहिवाशांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार, असे आश्वासन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असता दिले.
मसूरकर यांनी कोविड लॉकडाऊनच्या काळात लोकांना किराणामाल, फळ-भाजी स्वखर्चाने वितरित केली होती. कोविड रुग्ण सापडले असता प्रभाग 16 सह प्रभाग 15 मध्ये त्यांनी वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. कोविडमुळे मृत्यू आलेल्यांना शववाहिका उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खर्च केला. हा आपल्या समाजकार्याचा भाग असून हे कार्य आपण यापुढे चालूच ठेवणार आहे. सरकार दरबारी तत्परतेने लोकांची कामे करून घेण्यासाठी नगरसेवक असणे कामी येते. त्यासाठी आपणास भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी खारेबांद व प्रभागातील अन्य परिसरांतील मतदारांना केले.
मडगाव व अन्य पाच पालिकांच्या निवडणुकीची अजूनही तारीख घोषित करण्यात आलेली नाही. सर्व निवडणूक प्रक्रिया नव्याने हाती घ्यावी लागणार असून उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत यांच्या तारखा कधी जाहीर होतात याची प्रतीक्षा सध्या इच्छुकांना लागून राहिली आहे.