भोम ग्रामस्थांचा प्रखर विरोध, प्रचंड गदारोळात बैठक तोडग्याविना
वार्ताहर / माशेल
भोम पंचायत क्षेत्रातील कुंडई ओद्योगिक वसाहतीच्या पायथ्याशी होऊ घातलेला मेडीकल कचऱयावर प्रक्रिया या बायोमेडीकल प्रकल्पाविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी ठेवण्यात आलेली बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना प्रचंड गदारोळात फिस्कटली. ग्रामस्थांनी सदर प्रकल्प भोम पंचायत क्षेत्रात होऊ देणार नसल्याच्या पवित्र्यावर ठाम राहिल्याने मंत्री गोविंद गावडे व तांत्रिक टिमने काल रविवारी भोम येथील सातेरी मंडपात घेतलेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही, याप्रकरणी भोम नागरिक समितीने समितीची स्थापना करावी असा सल्ला मंत्री गावडे यांनी दिला.
सदर प्रकल्पाला भोम ग्रामसभेत प्रखर विरोध झाला होता. भोम पंचायत क्षेत्रात सदर प्रकल्प होऊ नये यासाठी फेब्रु. 2020 रोजी झालेल्या ग्रामसभेत ठरावही मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पाविषयी तांत्रिक बाबी जाणून घेण्यासाठी बैठक बोलाविण्याचे ठरले होते, त्यानुसार काल रविवार भोम येथील सातेरी मंडपात ही बैठक झाली. यावेळी आरजी संघटनेचे कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीअंतर्गत संतत्प ग्रामस्थ व मंत्री गोविंद गावडे यांच्यात अनेकवेळा शाब्दिक चकमकी झाल्या. मंत्री गावडे व तांत्रिक टीमचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ग्रामस्थ नव्हते. सदर विषयावर सरकारने जनसुनावणी ठेवावी अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. यावेळी मंत्री गावडे यांनी भोम नागरिक समितीला सदर विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांनी समितीची स्थापन करावे ज्यामध्ये तज्ञ डॉक्टर, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ व सरपंच व पंचसदस्यांचा सहभाग करावा अशी मागणी केली आहे. भोमा येथे सदर प्रकल्प सुरू झाल्यास ससंपुर्ण गोव्यातील इस्पितळातील मेडीकल कचरा या प्रकल्पात प्रक्रियेसाठी येणार आहे. त्यामुळे भोम भागातील जलस्रोत प्रदूषित होईल अशी भिती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाला त्वरीत स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे.