कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱया सुवेंदू अधिकारी यांच्याकडे भाजपने विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांची राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षासाठी पोषक ठरल्यामुळे त्यांच्यावर पक्षनेतृत्त्वाने विश्वास दाखवला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, सुवेंदू यांना संधी देत पक्षाने मोठी जबाबदारी दिली. पश्चिम बंगालच्या निवडणूक लढाईत सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढले होते. त्यांनी नंदिग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना 1,956 मतांनी पराभूत केले होते.