पंजाबमधील मतदानापूर्वी मोठी घडामोड ः
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याच्या दोन दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नामधारी समुदायाचे प्रमुख सतगुरु उदय सिंह यांनी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याची भेटीची दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. पंजाबच्या राजकारणात डेऱयांचे महत्त्व पाहता सतगुरु उदय सिंह आणि मोदींची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भैणी साहिबमध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेते पोहोचत असले तरीही हा समुदाय एकेकाळी काँग्रेसची मतपेढी राहिला होता. हंसपाल नामधारी दीर्घकाळापर्यंत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. नामधारी समुदायाचे मुख्यालय भैणी साहिबमध्ये आहे. या समुदायाचे 6-7 लाख मतदार आहेत. काही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी भैणी साहिब येथे पोहोचून सतगुरु उदय सिंह यांची भेट घेतली होती.
तर पंतप्रधानांनी पंजाबमधील मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी पंजाब आणि देशाच्या अन्य हिस्स्यांमध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये कार्यरत प्रमुख शीखधर्मीय व्यक्तींची भेट घेतली होती. शीख समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभा राहू शकतो असा संदेश देण्याचा प्रयत्न यातून देण्यात आला होता. कृषी कायदे रद्द केल्यावर राज्यात भाजपने ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता पक्ष पंजाबमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू पाहत असल्याचे मानले जातेय.